चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : – यात्रेतील तमाशा पाहत असताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना आडगाव ता. चाळीसगाव येथे बुधवारी रात्री सव्वादोन वाजेच्या सुमारास घडली. याबाबत संबंधित पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
दीपक धोंडिराम पाटील (३१, रा. आडगाव, ता. चाळीसगाव), असे या मृत तरुणाचे नाव आहे. दीपक याच्या पश्चात आई-वडील, बहीण, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.(केसीएन)त्याची आई सीमा पाटील या ग्रामपंचायत सदस्य आहे. वडील धोंडिराम पाटील शेती करतात. आडगाव येथे कोजागरी पौर्णिमेनिमित्त दिनांक १६ व १७ असे दोन दिवस ग्रामदैवत खबुलाल महाराज यांच्या यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्याच दिवशी तरुणांसोबत दीपक हा तमाशा पाहत होता.
अचानक तो खाली कोसळला. त्याला लागलीच चाळीसगाव येथे खासगी डॉक्टरांकडे नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. ही घटना तत्काळ तमाशाच्या ठिकाणी धडकली असता लगेच तमाशा बंद करण्यात आला व दुकानेदेखील बंद करण्यात आली. दीपकच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली. संबंधित पोलीस स्टेशनला घडण्याची नोंद करण्यात आली आहे.