मनमाड रेल्वे स्टेशनवर पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील वावडदा येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाला मोबाईल चोरीच्या आरोपाखाली मनमाड रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली आहे. त्याला पुढील कार्यवाहीसाठी चाळीसगाव रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मनमाड रेल्वे स्टेशनवर पोलीस अधिकारी गजानन पाटील आणि विलास बर्डे हे गस्त घालत होते. त्यावेळेला एक १७ वर्षीय अल्पवयीन तरुण संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून दोन सिम कार्ड नसलेले मोबाईल मिळून आले. त्याला विचारपूस केली असता त्याने सांगितले की शुक्रवार दि. १३ सप्टेंबर रोजी ११०७७ क्रमांकाच्या डाऊन रेल्वेच्या स्लीपर कोचमधून त्याने मनमाड ते चाळीसगावच्या दरम्यान हे मोबाईल चोरी केले.
त्यानंतर तो चाळीसगाव स्टेशनला उतरला होता. परत त्याने १२३२१ अप रेल्वे मध्ये बसून मनमाड स्टेशनवर आला. यानंतर मनमाड रेल्वे पोलिसांनी पुढील कार्यवाहीसाठी चाळीसगाव पोलीस स्टेशन येथे त्याला जमा केले आहे. दरम्यान हा अल्पवयीन मुलगा वावडदा ता. जळगाव येथील पाटीलवाड्यात राहणारा आहे.