जळगाव ( प्रतिनिधी ) ;- तीस लाख रुपयांसाठी सेवानिवृत्त परिचारीका स्नेहलता चुंबळे यांची हत्या केल्या प्रकरणी अटक झालेले व न्यायालयीन कोठडीत असलेले जि.पचे कर्मचारी असलेले बांधकाम विभागाचे वरिष्ठ सहाय्यक विजय निकम व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कनिष्ठ सहाय्यक जिजाबराव पाटील यांना जिल्हा परिषदेने निलंबित केले असुन तसे आदेश सीईओ यांनी दिले आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील सेवानिवृत्त परिचारीका ग. स. सोसाटीच्या सभेला आल्यानंतर दि. २० रोजीत्या बेपत्ता झाल्या होत्या. दि. २२ ऑगस्ट रोजी तालुका पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. ३० लाख रुपये एवढ्या मोठ्या रकमेसह महिला बेपत्ता असल्याने तालुका पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद होऊन आठवडा उलटला तरी तपास लागत नव्हता. त्यामुळे चिंतेत असलेले चुंबळे यांच्या मुलाने पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेत सर्व हकीकत सांगितली. त्या वेळी डॉ. रेड्डी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना तपासाविषयी सूचना दिल्या होत्या. तसेच या प्रकरणी पोलिसांना धागा गवसत दोघांना अटक केली होती. त्यांनी देखील हत्या केल्याची कबुली दिली आहे. गेल्या पंधरा ते २० दिवसापासून या हत्येचे गुढ अजून ही उकलले नाही.
जिजाबराव पाटील व विजय निकम यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ३० लाख रुपयांसाठी निवृत्त परिचारिका स्नेहलता चुंबळे यांचा जि.प. कर्मचारी जिजाबराव पाटील व विजय निकम यांनी गळा आवळून खून केला होता. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात येऊन ११ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या कोठडीची मुदत बुधवारी (११ सप्टेंबर) संपली. त्यामुळे दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.