जाब विचारण्यास गेलेल्या बापाला टवाळखोरांकडून सळईने बेदम मारहाण
एरंडोल (प्रतिनिधी ) विविध ठिकाणी टवाळखोरांकडून मुली महिलांच्या छेडखानीचे प्रकार नित्याचेच झाले असून गेल्या चार दिवसांपासून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काही चार तरुण काढत असल्याने याचा जाब विचण्यास गेलेल्या मुलीच्या बापाला लोखंडी सळईने डोक्यावर मारून गंभीर दुखापत केल्याची घटना आज शहरातील गांधीपुरा भागात घडली असून अशा टवाळखोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान मुलीच्या वडिलांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत सूत्रांची माहिती अशी कि, शहरातील एका परिसरात राहणारी १७ वर्षीय मुलगी हि दररोज गांधीपुरा परिसरातील नाका परिसरात जा -ये करीत असते. मात्र नाक्यावर चार टवाळखोर तरुण तिची छेड काढीत असल्याने तिने दररोज होणारा हा प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. तयामुळे आज सोमवारी दुपारी पीडित मुलीचे वडील हे तरुणांना जाब विचारण्यासाठी नाका परिसरात आले असता त्याचा राग आल्याने चौघांपैकी एकाने त्यांच्या डोक्यात लोखंडी सळई मारून रक्तबंबाळ केले .
तसेच इतर तिघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली . यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागरिकांनी उपचारासाठी एरंडोल आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत उशिरापर्यंत अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल झालेला नसून पोलीस याबाबत अनभिन्न होते. दरम्यान छेडखानीचे प्रकार शहरात वाढले असून अशा रोड रोमिओंचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.