कारागृहातील “दांगडो” प्रकरणी २३ जणांवर गुन्हे दाखल ; किशोर सोनवणे खून प्रकरणातील १० जणांचा समावेश
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा कारागृहात शुक्रवारी सकाळी झालेल्या गोंधळाप्रकरणी २३ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकाला सवलती मिळतात मग दुसऱ्याला का नाही असा भेदभावाचा आरोप करून जळगाव व चाळीसगावकडील दोन गट एकमेकांना भिडले. त्यात तुफान विटाफेक करून ४ जण जखमी झाले. विटाफेक करणाऱ्यांमध्ये जळगावच्या किशोर सोनवणे खून प्रकरणातील सर्व १० संशयित आरोपींचा समावेश आहे.
जनरल सुभेदार सुभाष बाबुराव खरे (वय ५६) यांनी फिर्याद दिली आहे. कारागृहामध्ये ४७८ पुरुष व २० महिला बंदी आहेत. गुरुवार दि. २९ रोजी बंदी लोमेश उर्फ निलेश उर्फ निलू आबा युवराज सपकाळे याला भेटण्यासाठी त्याचे नातेवाईक आले होते. (केसीएन) त्यावेळी त्याचे काहीतरी कॅन्टीनचे सामानासोबत विमल गुटखा सदृश्य पुड्यादेखील कारागृहात घेऊन जाण्यास नीलू आबाला सवलत देण्यात आली असा संशय चाळीसगाव येथील काही बंद्यांना आलेला होता. त्यामुळे आम्हाला काही देत नाही. नीलू आबा याला कसे काय कॅन्टीन सामान दिल, आम्हाला सवलती देत नाही यावरून दोन्ही गटांमध्ये कालपासून धुसफूस सुरू होती.
दरम्यान शुक्रवारी दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता न्यायाधीन बंदी सर्कल क्रमांक १ मधील गणेश दंगल सोनवणे व सर्कल क्रमांक ३ मधील बंदी लोमेश उर्फ निलेश उर्फ नीलू आबा सपकाळे यांच्यामधील वादाविषयी प्रभारी अधीक्षक राकेश देवरे हे सर्कलच्या गेट जवळ विचारणा करीत होते.
त्यावेळेला चाळीसगाव येथील राहणारे बंदी यांनी सर्कल गेट जवळ येऊन कर्तव्यावरील कर्मचारी जेल शिपाई विकास महाजन, नितीन अशोक सपकाळे, राजेंद्र पाटील यांच्या अंगावर धावून जाऊ लागले. त्यावेळेला निलेश सपकाळे व चाळीसगावच्या सचिन गायकवाड यांच्या गटातील बंद्यानी एकमेकांना शिवीगाळ करून शाब्दिक बाचाबाची करत हाणामारी केली. यावेळी जेल शिपाई यांनी बंद्यांना आत मध्ये ढकलून सर्कलचे दरवाजा लावून घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र बंदी जाण्यास तयार नव्हते. नंतर दोन्ही गटातील बंद्यांनी त्यांच्या समर्थक बंद्यांना सर्कल मधील बांधलेल्या भिंतीच्या विटा काढून एकमेकांच्या अंगावर फेकण्यास सुरुवात केली. यावेळी विटा फेकाफेकीत फिर्यादी सुभाष खरे व कर्मचारी नितीन सपकाळे यांच्या पायाला विटा लागल्या आहेत. तर बंदी सचिन सोमनाथ गायकवाड यांच्या नाकाला व सागर कोळी याच्या तोंडाला विट लागली आहे. (केसीएन)यानंतर कारागृह अधिकाऱ्यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला घटना कळवली. दंगा नियंत्रण पथक व आरसीपी लाटून हे कारागृहात आले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान घटनेमध्ये पहिल्या गटातील बंदी गणेश दंगल सोनवणे, विशाल संजय सपकाळे, महेश उर्फ मुकेश राजू सपकाळे, रुपेश संजय सपकाळे यांच्यासह किशोर सोनवणे खून प्रकरणातील संशयित आरोपी अमोल छगन सोनवणे, लोमेश उर्फ नीलू आबा युवराज सपकाळे, हितेश संजय बागुल, रुपेश मनोहर सोनार, प्रशांत उर्फ आकाश युवराज सपकाळे, मयूर विनोद कोळी, ईश्वर सुभाष काकडे, रुपेश सुभाष काकडे, प्रशांत सुभाष काकडे, ईश्वर उर्फ दुर्लभ नथू सपकाळे यांच्यासह दुसऱ्या गटातील अमोल छगन गायकवाड, कृष्णा छगन गायकवाड, सचिन सोमनाथ गायकवाड, अनिस उर्फ नव्या शेख शरीफ, सावंत मनसूब वाघरी उर्फ उग्रेजिया, उद्देश उर्फ गुब्बद, शुभम उर्फ विकी संजय पावले, श्याम उर्फ सम नामदेव चव्हाण, मोहनीराज उर्फ मुन्ना अशोक कोळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर यांची पदोन्नतीने मुंबई येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी अद्यापही कुणाचीही नेमणूक झालेली नाही. त्यामुळे कारागृहाच्या संदर्भातील सर्व प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत.