जामनेर तालुक्यात बुधवारी घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील एका गावामध्ये शौचास गेलेली १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी हिला संशयित आरोपीने जवळच्या केळीच्या बागेत नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय मुलगी तिच्या परिवारासह राहते. तिचा परिवार मजुरी काम करून उदरनिर्वाह करतो. दरम्यान बुधवारी दि. २८ रोजी सदर पीडित अल्पवयीन मुलगी ही शौचालयास गेली असताना गावातच राहणारा संशयित आरोपी अजय सुनील भिल (वय वर्ष अंदाजे १८ ते २०) हा तेथे आला. त्याने तिला जबरदस्ती केळीच्या बागेत नेले. त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. सदर मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यावर मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे करीत आहेत. सदर संशयित आरोपी अजय सुनील भिल याला अटक करण्यात आले असून अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा त्याला न्यायालयीन कामकाजासाठी नेण्यात आले होते. बलात्काराच्या घटना थांबण्यासाठी शासन कडक कारवाई करीत असल्याची भूमिका घेत असतानाही अशी हैवानी कृत्ये थांबण्याची नावे घेत नाही.







