सोयगाव तालुक्यातील धारकुंड धारेश्वर येथील घटना
सोयगाव (प्रतिनिधी) : सोयगाव तालुक्यातील धारेश्वर (धारकुंड) येथील धबधब्यखखाली अंघोळ करत असताना पाय घसरून पाण्याच्या कुंडात पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि. २६ रोजी दुपारी १ वाजता घटना घडली. सोयगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गजानन राघो माने (वय ४०, रा. केन्हाळा, ता. सिल्लोड) असे मृताचे नाव आहे. सोयगाव तालुक्यातील बनोटी गावापासून सहा कि.मी. अंतरावर धारकुंड धारेश्वर महादेवाचे तिर्थक्षेत्र आहे. श्रावण सोमवारनिमित्ताने सिल्लोड तालुक्यातील केन्हाळा येथील गजानन माने हा चार ते पाच मित्रांसोबत या मंदिरावर आले होते. तीनशे फुटावरुन कोसळणारा धबधबाखाली अंघोळ करण्यासाठी गजानन पाण्याच्या धारीजवळ गेला असता अचानक पाय घसरला व तेथील पाण्याच्या कुंडात जावुन पडुन पाण्यात बुडाला.
घटना बनोटी पोलीस चौकीत धडकली. पोलीस उपनिरीक्षक रज्जाक शेख यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गजानन मानेचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रज्जाक शेख तपास करीत आहेत.