अमळनेर तालुक्यातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : भूतान देशातून स्वस्त सोने मिळवून देण्याच्या नावाने एका कुटुंबाला पर्यटन कंपनीच्या संचालकाने २ लाख ७० हजार रुपयांत फसवल्याची घटना दिनांक ४ नोव्हेंबर २०२३ रोजी घडली. आजपर्यंत पैसे परत मिळाले नाही म्हणून उशिराने अमळनेर पोलिस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीत म्हटल्यानुसार, शैलेश भोगीलाल शहा (६०, न्यू प्लॉट, भागवत रोड) यांनी नया भारत हॉलिडे इंटरनॅशनल टुरिस्ट कंपनीकडे भूतानला जाण्यासाठी १ ऑक्टोबर २०२३ रोजी बुकिंग केले होते. दिनांक २ रोजी त्यांनी आगाऊ रक्कम म्हणून ५ हजार रुपये कंपनीचे मालक कल्पेश बाबुलाल पनारा यांच्या नावाने पाठवले व नंतर पनारा यांच्या अहमदाबाद जिल्ह्यातील वेजलपूर येथील अॅक्सिस बँकेत १ लाख रुपये भरले होते.
पुढे दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी शैलेश यांची पत्नी ज्योती हिच्या भ्रमणध्वनीवर कल्पेश याचा फोन आला की, भूतानमध्ये सोने २७ हजार रुपये तोळे आहे. आमचे एजंट बुकिंग करून ठेवतील व सहलीच्या दरम्यान तुम्हाला सोने मिळून जाईल. शैलेश यांनी ४ नोव्हेंबर २०२३ रोजी पनारा याच्या दोन बँक खात्यात प्रत्येकी १ लाख ३५ हजार असे मिळून २ लाख ७० हजार रुपये भरले व दहा तोळे सोने बुक केले. दिनांक ८ रोजी शहा कुटुंबीय भूतानला गेले. तेथे सोन्याबाबत विचारणा केली असता पनारा याने सहलीच्या शेवटच्या दिवशी देण्यात येईल, असे सांगितले.
दिनांक १५ रोजी अखेरच्या दिवशी त्यांना याबाबत विचारले असता सोने काही मिळाले नाही. तुम्ही अमळनेर जा. आम्ही तुम्हाला तेथे गेल्यावर २ लाख ७० हजार परत करू, असे सांगितले. मात्र वारंवार विचारणा करूनही पैसे परत न केल्याने अखेरीस शैलेश शहा यांनी अमळनेर पोलिस स्टेशनला आता कल्पेश पनाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास हेकॉ अशोक साळुंखे करीत आहेत.