जळगाव शहरातील महावीर नगर येथील घटना, अडीच लाखांचा ऐवज लांबवला
जळगाव : बाहेरगावी असलेली मुले घरी आल्याने त्यांच्यासह परिचयातील व्यक्तीकडे गेलेले प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील कर वसुली अधिकारी सी. एस. इंगळे व त्यांच्या पत्नी अॅड. रेखा इंगळे यांच्या घरावर पाच ते सहा जणांनी हल्ला केला. दरोड्याच्या या प्रयत्नात घरांच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यासह दुचाकी, वॉशिंग मशीन, खुर्चा, झाडांच्या कुंड्या यांची तोडफोड करून रोख सात हजार रुपये, सोन्याच्या चेनसह २ लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या हल्ल्यामध्ये घराच्या आवारात दगड, माती यांचा तसेच घरात काचांचा खच पडला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री शिवाजीनगर परिसरातील महावीर नगरात घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सहा हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लोखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
जळगाव येथून धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयात बदली होऊन गेलेले कर वसुली अधिकारी सी. एस. इंगळे यांचे महावीर नगरमध्ये घर आहे. बाहेरगावी शिक्षण घेत असलेले मुलगा व मुलगी हे घरी आले असल्याने शुक्रवारी रात्री इंगळे हे पत्नी अॅड. रेखा इंगळे व मुलांसह त्यांच्या परिचयातील रवींद्र वैद्य यांच्याकडे गेले होते. मध्यरात्री पाच ते सहा जण आले व त्यांनी घराच्या कंपाऊंडमध्ये घुसून हल्ला केला. हा हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी दरवाजाजवळील खिडकीमध्ये सात हजार रुपये असलेले पाकीट, ४० हजार रुपये किमतीचे आयपॅड, दोन लाख रुपये किमतीची सोन्याची चेन असा एकूण २ लाख ४७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. हा दरोड्याचा प्रयल असावा, असा अंदाज घर मालकांनी वर्तविला आहे.
इंगळे कुटुंबीय घराबाहेर असतानाच त्यांना पोलिसांचे रात्र गस्तीचे वाहन दिसले. त्यावेळी त्यांनी पोलिसांना याविषयी माहिती दिली. पोलिसांसह घराच्या दरवाजाचे कुलूप उघडून पाहणी केली असता घरामध्ये खिडकीच्या काचा मोठ्या प्रमाणात दिसल्या. तसेच वरील ऐवज गायब असल्याचेही लक्षात आले. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये पाच ते सहा जण एका गुलाबी रंगाच्या स्कूटरसह आल्याचे दिसले. त्यात सागर नामक एक जण असल्याचे पोलिसांनी ओळखले.
इंगळे हे घरी आले त्याच्या १० मिनिटे अगोदरच हल्लेखोर निघून गेले. घरावर काही जण हल्ला करीत तोडफोड करीत होते त्यावेळी दोन जण रस्त्यावर लक्ष ठेवून होते.या घटनेत इंगळे यांच्या घरातील व बाहेरील वस्तूंची मोठी नासधूस झाली आहे.
घराच्या बाहेरील बोळीतील वॉशिंग मशीन उलटवून देत नुकसान केले. रेखा इंगळे यांच्या दुचाकीचे नुकसान केले. त्यांनी सर्वच खोल्यांच्या खिडक्यांवर फरशा, दगड, खुर्चा मारून काचा फोडल्या. अॅड. रेखा इंगळे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सागर नामक व्यक्तीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सतीश पाटील करीत आहेत.