पाचोरा येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : येथील बस स्थानकातून बसमध्ये चढतांना एका ६० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील १ लाख १५ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी वृद्ध महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पाचोरा तालुक्यातील गाळण येथील रहिवाशी भिकुबाई अमरसिंग परदेशी (वय ६०) ह्या पाचोरा येथुन राहत्या गावी गाळण येथे जाण्यासाठी पाचोरा – गाळण बस मध्ये चढतांना त्यांच्या गळ्यातील काळ्या मण्यांची त्यात १५ ग्रॅम वजनाची १ लाख १५ हजार रुपये किंमतीची पोत अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे.
दरम्यान सदर प्रकार भिकुबाई परदेशी यांना बसमध्ये बसल्यावर लक्षात येताच चोरट्याचा शोध घेतला असता मिळुन न आल्याने दिनांक१४ आॅगस्ट रोजी भिकुबाई परदेशी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चोरट्याचा शोध पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुनिल निकम हे घेत आहेत.