अमळनेर शहरातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी ) ;- एका वृद्धाला घर नावावर करून देण्याची धमकी देऊन शिवीगाळ करीत अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कदायक घटना अमळनेर शहरातील बाहेरपुरा भागात १३ रोजी घडली असून याप्रकरणी अमळनेर पोलिसांत ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांची माहिती अशी की, ख्वाजा हसन अब्दुल गणी वय ७२ रा. बाहेरपूरा महोल्ला, अमळनेर हे वृध्द आपल्या परिवारासह राहायला असून सोमवारी १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ते त्यांच्या घरी असतांना गांधी नगरात राहणारे गुलाम अब्दुल रहेमान तेली यासह इतरांनी त्यांच्या घरासमोर येवून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यांनी ख्वाजा गणी यांना घर नावावर करून देण्याची मागणी करून धमकी देण्यास सुरवात केली. मात्र ख्वाजा यांनी घर नावावर करून देण्यास नकार दिल्याने गुलाम अब्दुल रहेमान तेली, रफिक अब्दुल रहेमान तेली, रहिम रमजान तेली, कांती रमजान तेली, जिशान कमाल तेली, असीम कमाल तेली, बाबु रमजान तेली, सादीक बाबु तेली, आसीफ बाबु तेली सर्व रा. गांधी नगर, अमळनेर या सर्वांनी वृध्दाला मारहाण करत अंगावर पेट्रोल टाकून दिले. त्यानंतर आगपेटीने पेटवून जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी ख्वाजा हसन अब्दुल गनी यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे ह्या करीत आहे.