
कासोदा व अमळनेर पोलिसांची कारवाई; २३ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरुद्ध जळगाव पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. कासोदा आणि अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून एकूण दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत ९ ब्रास वाळू आणि २ डंपर असा एकूण २३ लाख ४२ हजार ५५६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कासोदा पोलिसांची कारवाई
दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता कासोदा उतरण रोडवरील इंदिरा नगर, कासोदा गाव परिसरात सार्वजनिक रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत धर्मेश कैलास पाटील (रा. बिलाडी, ता. धुळे) हा डंपर चालक आणि आकाश राजेंद्र पाटील (रा. रेल्वे स्टेशन रोड, धुळे) हा डंपर मालक यांच्या ताब्यातील वाहनातून ३ ब्रास वाळू तसेच डंपर जप्त केला.
या प्रकरणी कासोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १८१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर पोलिसांची दुसरी कारवाई
अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतही अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यात आली. दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर श्री. विनायक कोते यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गांधली ते अमळनेर रोडवर एका डंपरमधून अवैधरीत्या वाळू वाहतूक होत आहे.
त्यानुसार त्यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. रात्री सुमारे ८.३० वाजता पथकाने गांधली ते अमळनेर रस्त्यावर नवलभाऊ आर्मी स्कूलसमोर गांधलीकडून येणारा डंपर थांबविण्याचा प्रयत्न केला.
मात्र, डंपर चालकाने वाहन थांबविण्यास नकार दिला. चालक अनिल चंद्रसिंग मोरे (वय २५ वर्षे, रा. खवजी नगर, बहादरपूर रोड, अमळनेर) आणि डंपर मालक अकबर पठाण (रा. खवजी नगर, बहादरपूर रोड, अमळनेर) अशी माहिती समोर आली.
पथकाने डंपरचा पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले. या कारवाईत ६ ब्रास वाळू आणि १ डंपर जप्त करण्यात आला. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ६०६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३०५(ई) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२ डंपर, ९ ब्रास वाळू जप्त
पोलिसांनी केलेल्या दोन्ही कारवायांमध्ये एकूण २ डंपर आणि ९ ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २३ लाख ४२ हजार ५५६ रुपये असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा व अमळनेर पोलिसांनी केली.
जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरुद्ध पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचे जळगाव पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.








