चोपडा शहर पोलिसांची कारवाई
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील चुंचाळे रोडवर स्वामी समर्थ केंद्राच्या पुढे दि. ११ रोजी सकाळी ८:२० वाजेच्या सुमारास चोपडा शहर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडे २ गावठी कट्टे, दोन जिवंत काडतूस, चाकू आणि चोरीची दुचाकी असा १ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
चोपडा शिवारात चुंचाळे रस्त्यावरील स्वामी समर्थ केंद्राच्या पुढे शहर पोलिसांनी सापळा लावला. ईश्वर किसन डावर (१९, आसरापानी), पप्पू जयराम डावर, (१८, मध्य प्रदेश) यांच्यासह एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतूस, एक चाकू आणि एक दुचाकी असा एकूण १ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पो. कॉ. रवींद्र बोरसे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपास पो. नि. मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि एकनाथ भिसे करीत आहेत.