भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथील घटना
यावल (प्रतिनिधी) : महावितरण कंपनीकडून वीज चोरीविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली होती. त्यात ओझरखेडा, ता.भुसावळ या गावात दि. १२ एप्रिल रोजी ४ जण वीज चोरी करताना आढळून आले. या चौघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिट नुसार दंड आकारून नोटीस देण्यात आली. मात्र, या चौघांनी वेळेत दंड अदा न केल्यानंतर त्यांच्याविरोधात आता यावल पोलिसात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
ओझरखेडा येथे वरणगाव ग्रामीण कक्ष २ च्या सहाय्यक अभियंता कविता निलेश लखोटे यांच्या नेतृत्वात वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. १२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेपासून ही मोहिम सुरू झाली. यात सुनील लक्ष्मण झोपे, नीलिमा नितीन झोपे, मोहम्मद अबूबकर व सावनकुमार यादव हे चौघे वीज चोरी करताना आढळले. या चौघांनी १ हजार १३२ युनिट वीज चोरी केल्याने त्यांना २७ हजार ४३० रुपये दंड आकारणी करून नोटीस देण्यात आली व दंड भरण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
मात्र या चौघांनी वेळेत दंड न भरल्याने यावल पोलीस ठाण्यात सहाय्यक अभियंता कविता लखोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासाकरिता हा गुन्हा पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.