जळगाव तालुक्यातील धामणगाव येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील धामणगाव येथे एका २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. दरम्यान मयत तरुण हा पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी यांचा पुतण्या आहे.
पियुष रमेश गोसावी (वय २२, रा.धामणगाव ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गावामध्ये आई, आजी, आजोबा यांच्यासह राहत होता. त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तर मोठे काका डॉ. अशोक गोसावी हे वैद्यकीय क्षेत्रात असून क्रमांक दोनचे काका प्रा. सुरेश गोसावी हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. (केसीएन) पियुष गोसावी हा शेती काम करून उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, बुधवार दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेनंतर तो घरी आला, त्यावेळेला त्याची आजी ओट्यावर बसलेली होती. पियुषने घरात जाऊन छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली.
काही वेळाने आजी घरात गेली त्यावेळेला तिला ही घटना समजली. दरम्यान काही वेळातच ममुराबाद गावात बँकेच्या कामाला गेलेली त्याची आई देखील परतली. त्यावेळेला तिने हंबरडा फोडला. (केसीएन)ग्रामस्थांनी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला खबर दिली. त्यानंतर पोलिसांनी पियुषचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. तेथे तपासणी करून वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन देवचे यांनी त्यास मयत घोषित केले. यावेळेला कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते.
दरम्यान, जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पियुष गोसावी या तरुणाच्या जाण्यामुळे कुटुंबीयांना धक्का बसला असून धामणगाव गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.