जळगाव तालुक्यातील फुपनगरीजवळ घटना, धानोरा येथे शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील धानोरा येथून जळगाव येथे येत असताना दुचाकीस्वारांना शिवशाही बँडच्या वाहनाने सोमवारी दि. ५ ऑगस्ट रोजी मागून जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जखमी झाले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
बाळू प्रल्हाद कोळी (वय ५०, रा. धानोरा ता. चोपडा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले असा परिवार आहे. शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. सोमवारी दि. ५ ऑगस्ट रोजी ते दुपारी १ वाजेला बाळू कोळी हे धानोरा गावातील गोपाळ बस्तीराम साळुंखे (वय ४०) आणि विजय जगन्नाथ लोहार (वय २५) यांच्यासह जळगाव येथे दुचाकीने येत होते.(केसीएन)दुपारी २ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील फुपनगरी गावाजवळ महादेव मंदिराजवळ शिवशाही बँड पथकाच्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरात धडक दिली.
या धडकेत दुचाकीवरील तिघे रस्त्यावर फेकले गेले. यात बाळू कोळी हे गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळू कोळी यांना तपासून मयत घोषित केले.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. जळगाव तालुका पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.