पाचोरा पोलीस स्टेशनची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दोन संशयितांना ताब्यात घेतले. विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांनी एकूण १५ मोटरसायकल चोरी केल्याचे संशयित आरोपींकडून उघडकीस आले आहे. त्यांना अटक करण्यात आली असून कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती सोमवारी दि. २९ जुलै रोजी पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली.
दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे ते उघडकीस आणण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिले होते. पाचोरा तालुक्याच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढलेले होते. त्यानुसार पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे यांच्या सूचनेनुसार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना पाचोरा शहरात दुचाकी चोर फिरत असल्याची माहिती दिली. (केसीएन)या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक यांच्यासह कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. संशयित आरोपी विशाल पांडुरंग पाटील (वय-२६, रा. गजानन नगर, पाचोरा) आणि रवींद्र बाबुराव पाटील (वय-२९ रा. गोंडगाव ता. भडगाव) या दोघांना चोरीची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीई १८१०) सह पाचोरा पोलीसांनी अटक केली आहे.
दोघेही संशयतांवर प्रथमच गुन्हा दाखल झाले आहेत. तर आणखी एका व्यक्तीचे नाव निष्पन्न असून त्याला अटक करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे डॉ. रेड्डी यांनी सांगितले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी इतर चोरीच्या १४ अश्या एकूण चोरीच्या १५ दुचाकी काढून दिल्या आहेत. (केसीएन)ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ राहुल शिंपी, रणजीत पाटील, श्यामकांत पाटील, योगेश पाटील, विनोद बेलदार, सचिन पवार, हरीश अहिरे आणि सुनील पाटील यांनी केली.