धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे दिनांक २४ जुलै रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चामुंडा माता मंदिराचा मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर मंदिरात असलेल्या दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील रोकड लंपास केली.
हा प्रकार मंदिराचे ज्येष्ठ मार्गदर्शक देविदास गुलाब बडगुजर हे सकाळी पूजा करायला गेल्यानंतर लक्षात आला. त्यांनी लगेच चामुंडा माता मंदिराचे ट्रस्टी, मार्गदर्शक तसेच समाजबांधवांना बोलावले. त्यानंतर मंदिराचे ट्रस्टींनी पोलिस पाटलांना सूचना देऊन धरणगाव पोलीस ठाण्यात सूचना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या दानपेटीतील सुमारे १३ हजार रुपये चोरी झाल्याचा अंदाज आहे. धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.