धरणगाव तालुक्यातील चांदसर रस्त्यावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : विना परवाना वाळूचे उत्खनन करुन चोरटी वाहतूक करताना मंडळ अधिकाऱ्याने ट्रॅक्टर पकडले. हे वाहन पोलीस ठाण्यात नेत असताना अधिकाऱ्याला चकवा देत चालकाने जबरीने ट्रॅक्टर पळवून नेले. मंगळवार दिनांक २ जुलै रोजी मध्यरात्री ही घटना चांदसर रोडवर शेरीगावाजवळ घडली. या प्रकरणी मंगळवार दिनांक २३ रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला.
ट्रक्टर क्रमांक (एमएच १९ बीजी ५४७१) याला लावलेल्या ट्रॉलीत तीन हजार किमतीची एक ब्रास वाळु भरली होती. महसूलच्या पथकाने या वाहनाची चौकशी केली असता चालकाकडे वाळु वाहतुकीचा परवाना नसल्याची माहिती समोर आली. त्यानंतर हे वाहन पाळधी पोलीस दूरक्षेत्र येथे पथक घेवून जात होते.
दरम्यान चालकाने मंडळ अधिकारीसह इतरांना चकवा देत वाळूचे ट्रॅक्टर जबरीने पळवून नेले. या प्रकरणी मंडळ अधिकारी अमोल पाटील यांच्या तक्रारीनुसार आकाश कोळी, योगेश कोळी (दोन्ही रा. चांदसर) यांच्याविरुध्द मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्सटेबल अर्जुन कुवारे हे करीत आहेत.