पाचोरा येथील घटना, कर्मचाऱ्यांचे सर्वस्तरातून कौतुक
पाचोरा (प्रतिनिधी) : येथील शंभू नगर मधील राहणाऱ्या तरुणाने फाशी घेण्याचा निर्णय घेतला. त्याने घरात मधून दरवाजा लावला व त्याने पाचोरा पोलीस हेल्पलाइन ११२ क्रमांक यावर फोन केला व सांगितले. “मी काही कारणास्तव आत्महत्या करीत आहे” हे ऐकताच ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार यांनी कुठलाही विलंब न लावता आपले वरिष्ठ अधिकारी निरीक्षक अशोक पवार यांना सांगितले.
अशोक पवार यांनी ताबडतोब विनोद बेलदार व पोलीस गाडीचे ड्रायव्हर समीर पाटील यांना त्या स्पॉटवरपाठविले. फाशी घेत असलेल्या व्यक्तीचे घर गाठले. त्या ठिकाणी आतून दरवाजा लावलेला असल्यामुळे विनोद बेलदार यांनी आपली पूर्ण ताकद लावून तो दरवाजा तोडला व आत प्रवेश करून त्याला दोरीवर लटकलेला असताना खाली उतरवले व त्याच्यावर योग्य उपचार करून त्याला त्याच्या परिवाराच्या ताब्यात दिले. या ३० वर्षीय तरुणाने जीवन संपवण्याच्या आतच त्याचा जीव वाचला. पोलिसांमध्येही माणुसकी असते हे आज सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.