रावेर तालुक्यातील पाल येथील घटना
रावेर (प्रतिनिधी) : शेतात काम करीत असतांना एका युवकाला सर्पदंश झाल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना रावेर तालुक्यातील पाल येथे घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सीताराम गोरेलाल पवार (वय २४ रा. पाल ता.रावेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. आली थे तो परिवारासह राहत होता. शेतमजुरी करून उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन)रविवारी दि. १४ रोजी शेतात काम करताना त्याला सर्पदंश झाला. सीताराम हा मोरव्हाल रस्त्यावरील शिवपट्टी भागातील स्वतःच्या शेतात काम करीत होता. सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास तो बेशुद्धावस्थेत आढळला.
त्याच्या तोंडातून फेस निघत होता. त्याच्या डाव्या हाताच्या कोपर्याला सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यास पाल येथील खासगी रुग्णालयात कुटुंबीयांनी दाखल केले असता तेथून त्याला रावेरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून सीताराम यास मृत घोषित केले. याबाबत गणेश पवार यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस हेड कॉस्टेबल विष्णू भील करीत आहेत .