चोपडा शहरातील घटना
चोपडा (प्रतिनिधी) : शहरामध्ये एका कुटुंबीयांच्या हळदीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या तरुणाचा नाचत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही घटना चोपडा येथील श्रीरामनगरमध्ये बुधवारी रात्री घडली.
मयूर राजेंद्र शिंदे (वय ३१, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरुण, जळगाव) असे या मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बहीण, भाऊ, मुले असा परिवार आहे. (केसीएन)मयूर हा बुधवारी दिनांक १० जुलै रोजी नातेवाईकाच्या लग्नानिमित्त चोपडा येथे आला होता. हळदीच्या कार्यक्रमात नाचत असताना त्याच्या छातीत अचानक दुखू लागले आणि तो खाली पडला.
नातेवाईकांनी मयूर याला तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणले. तिथे डॉ. सागर पाटील यांनी त्याला मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला.(केसीएन)याबाबत चोपडा शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ शेषराव तोरे करीत आहेत. तरुणाच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबीयांना धक्का बसला असून जळगाव शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.