पाचोरा तालुक्यात खळबळ : संशयिताला अटक
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील आर्वी येथे बारा वर्षीय विद्यार्थिनीला रात्री झोपेतून उचलून अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना पाचोरा तालुक्यातील आर्वी येथे समोर आली आहे. या प्रकरणी संशयित परप्रांतीय व्यक्तीवर पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील आर्वी येथे दि. ४ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास १२ वर्षीय मुलगी कुटुंबातील सदस्यांसोबत झोपलेली होती. विनोदकुमार बच्छावसिंग पटेल (वय ३७, सेक्टर- ६ टकहीया पहाडी वॉर्ड- १५ परसोइ ओझर, सोनभद्र, उत्तर प्रदेश) असे संशयिताचे नाव आहे. याने तिचे झोपेत तोंड दाबून खांद्यावर उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या हातात आईच्या साडीचा पदर असल्याने साडी ओढली गेली व तिच्या आईला जाग आली.
या प्रकाराने भयभीत झालेल्या तिच्या आईने आरडाओरड करताच संशयिताने मुलीला सोडून तेथून पळ काढला. या संशयिताचा मुलीच्या नातेवाइकांनी शोध घेतला, परंतु तो आढळून आला नाही. घटनेची खबर पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांना मिळताच त्यांनीही तपासाचे चक्र गतिमान करत त्याचा शोध घेतला. त्यास ताब्यात घेत पाचोरा पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान चौधरी करीत आहेत.