पाचोरा शहरातील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : शहरातील सुपडू भादू विद्यालयाच्या परिसरात असलेल्या एका बँकेतून वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने काढलेले २ लाख रुपये अज्ञात भामट्यांनी लांबवल्याची घटना गुरुवार दि. ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघड झाली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभाष पाटील (वय ७१, रा. तलाठी कॉलनी, पाचोरा) यांनी फिर्याद दिली आहे. पाचोरा शहरांमध्ये गुरुवार दि. ४ जून रोजी एचडीएफसी बँकेतून दुपारी १२ वाजता त्यांनी २ लाख रुपये काढले. पैसे काढून दुपारी साडे बारा वाजता बँकेबाहेर आले असता जाण्यासाठी दुचाकीला चाबी लावीत होते. त्याचवेळेस एका इसमाने त्यांचे जवळ येऊन चाबीस झटका मारला.
सुभाष पाटील हे खाली पडलेली चाबी शोधत असतानाच त्यांची पैशाची बॅग घेऊन चोरट्याने पळ काढला. त्याचा साथीदार सुपडू भादू विद्यालय या शाळेकडून त्याचेसमोर दुचाकी घेऊन आला. त्या भरधाव दुचाकीवर सदर चोरटा बसला आणि तिथून दोघेही चोरटे क्षणातच पसार झाले. काही कळण्याच्या आधीच वयोवृद्धाच्या हातातील दोन लाख रुपये चोरट्यांनी पसार केले.
यानंतर या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने पाचोरा पोलीस स्टेशनला धाव घेतली. त्या ठिकाणी तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भर दिवसा लुटीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.