भुसावळ शहरातील वांजोळा रस्त्यावरील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील वांजोळा रोडवरील गजानन अपार्टमेंटमध्ये बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सुमारे १० तोळे सोने व ८ हजारांची रोकड लांबवली. घरफोडीचा धक्कादायक प्रकार शनिवारी दि. २९ रोजी दुपारी चार वाजता उघडकीस आला आहे.
नरेश घनश्यामदास रोहाडा यांच्या वांजोळा रोडवरील गजानन अपार्टमेंटमधील फ्लॅट नं. ३०३ मध्ये घटना घडली आहे. त्यांचा शिलाई मशीन दुरुस्तीचा व्यवसाय आहे. त्यांची पत्नी माहेरी गेल्यानंतर नरेश हे शनिवारी नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून दुकानात सकाळी गेले. ते दुपारी चार वाजता घरी आले असता घराला कुलूप दिसले नाही व घरात प्रवेश केल्यानंतर घरातील सर्व साहित्यांची फेकाफेक झाल्याने घरफोडी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी तत्काळ त्यांच्या मित्र परिवाराला व बाजारपेठ पोलिसांना माहिती दिल्यानंतर डीवायएसपी कृष्णात पिंगळे, निरीक्षक गजानन पडघन, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव यांनी भेट दिली.
रोहाडा यांनी घरात ठेवलेले साडेसात लाख रुपये किंमतीचे १० तोळे सोने व ८ हजार रूपये रोख चोरट्यांनी चोरून नेल्याचे सांगितले. पोलिसांकडून या भागातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. चोरट्यांनी चोरी केल्यावर दाराला लावलेले कुलूप सुध्दा चोरून नेले. रोहाडा यांच्या घराचे कुलूप कुठेही मिळून आले नाही, असे त्यांनी सांगितले. चोरी झाल्यामुळे पोलिस प्रशासनाने जळगाव येथून श्वान पथकाला पाचारण केले. भर दुपारी चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.