जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एका महिलेने व्याजाची रक्कम न दिल्याने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन महिलेच्या मुलीचा ती शिकत असलेल्या शाळेत शिक्षकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच या विद्यार्थिनीसह तिच्या बहिणीला मारून टाकण्याचीही धमकी देण्यात आली. हा प्रकार दिनांक १२ ते १८ जून दरम्यान एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात घडला. शिक्षकासह चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणारी महिला गृहउद्योग करते. व्यवसाय वाढीसाठी त्यांनी सुवर्णा रामकृष्ण पाटील (रा. खोटेनगर) व वंदना अजय पाटील (रा. श्रद्धा कॉलनी) यांच्याकडून व्याजाने दोन लाख रुपये घेतले. त्या बदल्यात त्यांनी आतापर्यंत सहा लाख रुपये दिले. त्यानंतरही ते पैशासाठी तगादा लावत होते. १ लाख ४० हजार रुपये बाकी असल्याने १२ जून रोजी सुवर्णा पाटीलसह तिचा पती रामकृष्ण देवराम पाटील, वंदना पाटील व तिचा पती तथा शिक्षक अजय पाटील यांनी महिलेच्या घरी येत गैरवर्तन केले.
दिनांक १८ जून रोजी या महिलेची १४ वर्षीय मुलगी शाळेत गेलेली असताना शिक्षक अजय पाटील याने तिचा विनयभंग केला. हा प्रकार मुलीने घरी सांगितला असता तिच्या आईने सुवर्णा पाटील हिला विचारणा केली, त्यावेळी तिने शिवीगाळ केली. या प्रकरणी विद्यार्थिनीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून २३ जून रोजी सुवर्णा पाटील, रामकृष्ण पाटील, अजय पाटील, वंदना पाटील यांच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि राजेंद्र उगले करीत आहेत.