भुसावळ (प्रतिनिधी) : स्टेट बँकेच्या क्रेडीट कार्ड सर्विसमधून बोलत असल्याचे भासवून भुसावळातील ५६ वर्षीय महिलेला तब्बल २ लाख २९ हजारांचा गंडा घालण्यात आला. दिनांक ९ जून २०२४ रोजी ही घटना घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभांगी सिद्धेश पाटील ( वय ५६, बीपीसी बँक कॉलनी, भुसावळ) यांनी फिर्याद दिली आहे. दि. ९ जून रोजी दुपारी १२.४८ वाजता त्यांना मोबाईल ८०१७८०२८६५ वरून कॉल आला व समोरून इसमाने एसबीआय क्रेडीट कार्ड विभागाच्या कस्टमर केअर विभागातून बोलत असल्याची बतावणी केली. आपल्या खात्याचे रीफंड पैसे आल्याचे सांगत एपीके फाईल पाठवत असल्याचे भामट्याने सांगून त्यात विचारलेली संपूर्ण माहिती भरून पाठवण्याचे सांगितले.
शुभांगी पाटील यांनी भामट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत आलेल्या फाईलवर सर्व माहिती भरून संबंधिताला पाठवली. याच दिवशी दुपारी दिड वाजेच्या सुमारास सुरूवातीला २९ हजार व काही वेळेत दोन लाख रुपये खात्यातून कट झाल्याचा मेसेज आला. आपली फसवणूक झाल्याचे शुभांगी पाटील यांना लक्षात येताच त्यांनी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला धाव घेतली व गुन्हा दाखल केला. तपास निरीक्षक संदीप रणदिवे करीत आहेत.