वडीगोद्री जालना ;- गेल्या १० दिवसांपासून ओबीसी आरक्षण संरक्षणार्थ केलेले उपोषण लक्ष्मण हाके यांनी स्थगित केले आहे. सरकारचे शिष्टमंडळ आज त्यांच्या भेटीसाठी गेले होते. यामध्ये छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातील गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांच्यासह अन्य मंत्री होते. मंत्र्यांच्या विनंतीनंतर हाके यांनी त्यांचं उपोषण स्थगित केलं.
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास ओबीसी आरक्षणात स्पर्धा वाढण्याची असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या विरोधात प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण छेडले होते. गेल्या १० दिवसांपासून ते उपोषणाला बसले आहेत. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडेंसह अनेक नेत्यांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शवला होता.
अधिवेशनाच्या काळात सर्वपक्षीय बैठकीत यामध्ये चर्चा करुन निर्णय घेण्याचं आश्वासन सरकारनं दिलं आहे. आम्ही फक्त त्या आश्वासनावर विश्वास ठेवणार नाही. आमच्या मागण्या पूर्णपणे मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.आता ते फक्त तात्पुरतं स्थगित केलं आहे, अशी घोषणा हाके यांनी केली.
लक्ष्मण हाकेंच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी ओबीसी नेत्यांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळानं शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे यांच्यासह वेगवेगळ्या पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते.
या बैठकीनंतर बोलताना छगन भुजबळ यांनी बैठकीत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “मराठा समाजाला ‘सरसकट ओबीसी’ अशी मागणी मान्य करता येणार नाही. ती कायद्यातही बसणार नाही”.पावसाळी अधिवेशनामध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली जाणार आहे. यामध्ये सगे सोयरेंबाबत काय निर्णय घेतला जाणार आहे असेही भुजबळ यांनी सांगितले. खोटी सर्टिफिकेट कोणालाही दिली जाणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले आहे. खोटे कुणबी दाखले दिले गेले असतील तर ते तपासले जातील असेही आश्वासन देण्यात आले, असं भुजबळांनी स्पष्ट केलं होतं.
मराठा आणि ओबीसी समाजात वाद होवू नये, यासाठी चर्चा झाली. अधिवेशनाच्या काळात काही मुद्द्यांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचे ठरवण्यात आले आहे. लक्ष्मण हाके यांनी आंदोलन मागे घेतले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री