मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : शहरातील एका तरुणीचा नुकताच सोहागपूर (मध्य प्रदेश) येथील तरुणासोबत विवाह झाला. विवाह नंतर नवरदेव नवरीसह रेल्वेने सोहागपूरला निघाले. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. खंडव्यानजीक नवरदेवाचा रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आणि लग्नघरी मोठी शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
पाचोरा येथील सिंधी समाजाचे मुखिया गुलाब मिरचूमल पंजवानी यांची मुलगी एकता हिचा विवाह सोहागपूर येथील राकेश रामचंदानी यांच्याशी ११ जून रोजी झाला. लग्नानंतर नवविवाहित दाम्पत्य नातेवाईकांसोबत सायंकाळी गरीब रथ एक्सप्रेसने सोहागपूरकडे निघाले. रात्री ११ वाजता रेल्वे खंडवा जंक्शनवर पोहोचली. राकेश आणि एकता यांचे आरक्षण वेगवेगळ्या डब्यात होते, एका डब्यात नातेवाईक मंडळींशी राकेश गप्पा मारत होता. नंतर तो आपल्या बोगीकडे आला. सकाळी पाच वाजता सोहागपूर येथे पोहोचल्यावर नववधूसह नातेवाईक रेल्वेतून खाली उतरले.
तिथे राकेश मात्र दिसला नाही. त्यामुळे सर्वांनी राकेशला शोधायला सुरुवात केली. त्याचा मोबाईल हा नववधूजवळ होता. नातेवाईकांनी ही घटना रेल्वे पोलिसांना कळवली. नवरदेव राकेश यांचे मेहुणे हे खंडवा येथे राहतात. त्यांना नातेवाईकांनी फोन करुन या घटनेची माहिती दिली. त्यांनी खंडवा जीआरपी यांच्याशी संपर्क केला.
त्यावेळी तेथील अधिकाऱ्याने सुरगांव- बंजारी येथे रेल्वे मार्गावर एक अनोळखी मृतदेह आढळला असल्याचे सांगितले. संबंधित जीआरपी अधिकाऱ्याने फोटो नातेवाईकांना दाखवला असता तो राकेश रामचंदाणी याचाच असल्याचे दिसून आल्याने सर्वांनी एकच हंबरडा फोडला. दरम्यान लग्नघरात पसरल्याने मोठी हळूहळू व्यक्त करण्यात येत आहे.