मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या संकटातही अत्यावश्यक सेवेकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेली मुंबईची जीवनवाहिनी बेस्ट. या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आपण खऱ्या अर्थाने ‘बेस्ट’ योद्धे असल्याचं दाखवून दिलं. कामगारांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन आजपासून बेस्ट बंद ठेवण्याचं आवाहन केलं खरं, पण नेत्यांचा आदेश झुगारून बेस्ट कर्मचारी आपल्या कर्तव्याला जागले. जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठीच नेत्यांनी पुकारलेले आंदोलन उधळून लावले आणि आपण खऱ्या अर्थाने कोविड योद्धे आहोत हे दाखवून दिले.
विशेष म्हणजे बेस्ट सेवा नेहमीप्रमाणे सुरु आहे. रोजच्या प्रमाणे आजही बेस्ट रस्त्यावर धावल्या. सकाळी 9 वाजेपर्यंत 1450 बसेस धावल्या आहेत. सुमारे दोन महिने रेल्वे सेवा बंद आहे. या काळात बेस्ट हीच मुंबईची जीवनवाहिनी बनली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेने संकटकाळात आंदोलन पुकारणारे नेते तोंडावर आपटले आहेत.
बेस्ट यूनियनने कोरोनापासून सुरक्षततेसाठी काही मागण्या केल्या होत्या. आतापर्यंत बेस्टच्या 120 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 52 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.