जळगाव जिल्हापेठ पोलीस स्टेशनची कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) : येथील नवीन बसस्थानकात दोन प्रवाशांचे मोबाईल चोरी झाल्याची घटना शनिवारी १ जून रोजी दुपारी १२ वाजता घडली होती. या गुन्ह्यातील चोरट्याला अवघ्या ४ तासात जिल्हापेठ पोलीसांनी बसस्थानक आवारातून अटक केली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुजीबुर रहमान मोहम्मद इस्माईल (वय २५, रा. गुलशन नगर, मालेगाव, ता. नाशिक) असे चोरट्याचे नाव आहे. विठ्ठल पेठ येथील राहणारे सुरज संजय बारी हे रेल्वेत हेल्पर म्हणून नोकरीस आहे. शनिवार १ जून रोजी ते भुसावळ येथून जळगाव येथे बसने आले. दुपारी १२ वाजता नवीन बसस्थानक येथे ते बसमधून उतरले असता, त्यांना पॅन्टच्या खिशातून मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आले. दरम्यान, याच बसमधील संतोष लक्ष्मण वानखेडे (वय ४३, रा. अनुराग स्टेट बँक कॉलनी) यांच्या शर्टाच्या खिशातून देखील मोबाईल चोरीला गेला होता. यावेळी बारी यांनी लागलीच जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती.
त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ सलिम तडवी, पोकॉ तुषार पाटील व जयेश मोरे यांचे पथक रवाना केले. या पथकाने संशयास्पदरित्या फिरणाऱ्या मुजीबुर रहमान मोहम्मद इस्माईल याला बसस्थानक आवारातून दुपारी ४ वाजता ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडे चोरलेले दोन मोबाईल मिळून आले. पोलिसांनी ते मोबाईल हस्तगत केले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल पल्लवी मोरे ह्या करीत आहे.









