जळगावातील एमआयडीसी परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरात गुंडगिरी वाढतच आहे. एमआयडीसीतील वैष्णवी पॉलीमर कंपनी येथे चहा व सिगरेटचे पैसे मागितल्याच्या रागातून चहाविक्रेत्या महिलेला दोन जणांनी टपरी उलटी करून नुकसान करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी बुधवारी दि. २९ रोजी पहाटे ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसीतील व्ही सेक्टरमधील वैष्णवी पॉलीमर कंपनीजवळ सारीका राजेश वसाणे (वय-४०) या चहा टपरी चालवून उदरनिर्वाह करतात. कंपनीच्या समोरच त्यांची चहाची टपरी आहे. बुधवारी दि. २९ मे रोजी रात्री १२.३० वाजता महिला ही टपरीवर असतांना करण पाटील आणि चेतन माळी यांनी महिलेच्या टपरीवर येवून चहा व सिगरेट घेतली. त्यानंतर महिलेने चहा व सिगरेटचे पैसे मागितले. या कारणावरून करण पाटील आणि चेतन माळी यांनी महिलेला शिवीगाळ करत चहाची टपरी उलटी करून नुकसान केले. तसेच लाकडी दांडक्याने डोक्यावर मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी महिलेने पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार पहाटे ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारहाण करणारे करण पाटील आणि चेतन माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.