चाळीसगाव तालुक्यातील लाखोंचा सशस्त्र गुन्हा उघडकीस, मध्यप्रदेशाच्या तिघांना अटक
एलसीबी, मेहुणबारे पोलिसांचा यशस्वी तपास
जळगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीत दहिवद गावी दि. १२ मे रोजी अज्ञात दरोडेखोरांनी कापूस व्यापाऱ्याला शस्त्रांचा धाक दाखवून १६ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेत कुठलेही सीसीटीव्ही फुटेज, दरोडेखोरांचे वर्णन, पुरेसे धागेदोरे उपलब्ध नसताना केवळ “क्राईम स्टडी” करून पोलिसांनी तिघा संशयितांना थेट मध्यप्रदेशातील एका छोट्या खेड्यातून मुद्देमालासह अटक करण्यात यश मिळविले. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी दि. २७ रोजी पत्रकार परिषदेत दिली.
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीत दहिवद गावात दि. १२ मे रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या दरम्यान कापूस व्यापारी धर्मराज पाटील यांच्या घरात सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून लोखंडी व लाकडी रॉडने पाटील परिवाराला मारहाण केली होती. तसेच घरातील दागिने, मोबाईल असा १६ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात कुठलाही धागा संशयितांनी ठेवलेला नव्हता. त्यामुळे आव्हानात्मक या गुन्ह्यात पोलिसांनी जुन्या गुन्ह्यांचा व भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला.
घटनेचे कुठलेही सीसीटीव्ही फुटेज नव्हते. दरोडेखोरांनी तोंड बांधलेले असल्याने त्यांना कोणीही पाहिलेले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी “क्राईम स्टडी” वर भर देत केवळ १३ दिवसात तपास लावला. चाळीसगाव तालुक्यात कामाला पावरा समाज अधिक कामाला आहे. त्यावरून धागा मिळाल्यावरून मध्यप्रदेशातील भामपूर येथील अतिदुर्गम भागात पोलिसांनी जाऊन तिघांना ताब्यात घेतले. यात कालूसिंग हुजारिया बारेला (वय ५२, रा. भामपूर ता. सेंधवा जि. बडवाणी, मध्यप्रदेश), सुनील मुरीलाल बारेला (वय २१, रा. बुलवानीया ता. सेंधवा जि. बडवाणी, मध्यप्रदेश) व एक अल्पवयीन मुलगा यांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याकडे दागिने, बोलेरो कार, दुचाकी, दरोड्याचे साहित्य असे मिळून आले आहे. त्यांच्याजवळ जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून चोरलेली दुचाकीदेखील मिळून आली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, एलसीबीचे वरिष्ठ पो. नि. किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी, मेहुणबारे पोलीस स्टेशनने केली आहे. पुढील तपास सपोनि संदीप परदेशी करीत आहेत.