खरीप हंगामाची तयारीत गुंतला बळीराजा
जळगाव (प्रतिनिधी) : सध्या वातावरणात बदल झाल्याचे दिसून येताच शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामांना गती दिली आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील शेत शिवारात शेतकरी वखरणी, नांगरटी, रोटोव्हेटर मारुन शेती तयार करण्याच्या कामांकडे वळल्याचे दिसून येत आहे.
लग्न समारंभ आणि लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर शेतकरी राजाने शेताकडे धाव घेतली आहे. पावसाळा सुरू व्हायला अवघे १० ते १५ दिवस उरले आहेत. गतवर्षी कुठल्याही शेतीमालाला अपेक्षित असा भाव शेतकऱ्याला मिळाला नाही. तर सतत नैसर्गिक आपत्ती, रोगराई तसेच उत्पादित मालाला योग्य न मिळाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. परंतु, भाव मिळो वा ना मिळो, शेती पिको अथवा न पिको, अशा अनेक संकटांचा सामना करत बळीराजा पुन्हा नव्या जोमाने खरीप हगांमाच्या तयारीला लागला आहे.
पेरणीपूर्व नांगरणी, वखरटी यासह विविध शेतीची कामे आटपून घेण्यासाठी बळीराजा सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. तसेच पिक लागवडीसाठी शेतकरी चांगल्या वाणाची कृषी सेवा दुकानदाराकडे विचारपूस करताना दिसत आहेत. निसर्गाचा अंदाज घेत पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना शेतकऱ्यांनी वेग दिला आहे.
दरम्यान, सध्या शेती परवडेनाशी झाली असून काही वर्षापासून शेतमालाचे भाव व लागवडीसाठी लागणारा खर्च याचा हिशोब घातला तर खर्च निघणे मुश्किल झाले आहे. यातच निसर्गाचा लहरीपणा आणि इतर संकटाचा सामना करत बळीराजा पुन्हा आपल्या शेती कामाच्या मशागतीसाठी सज्ज झालेला दिसून येत आहे.