पिंपरखेड येथे घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील वरखेड ते पिंपरखेड गावाचे मधिल दगडाचे खदानीत दि. ८ मे रोजी सकाळी ६५ वर्षीय वृद्धास काहीतरी घातक शस्त्राने मारहाण करून जिवे ठार मारल्याची घटना उघड झाली होती. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) ५ तासात जलद तपास करीत एका २१ वर्षीय तरुणाला अटक केली होती. आता भडगाव पोलीस स्टेशनने आणखी एका संशयित आरोपीला अटक केली आहे.
सुपडु नाना वेलसे (वय ६५, रा. पेठ भाग, भडगाव) असे मयत वृद्धाचे नाव आहे. त्यांचा मृतदेह भडगाव तालुक्यातील वरखेड ते पिंपरखेड गावाचे मधिल दगडाचे खदानीत दि. ८ मे रोजी सकाळी मिळून आला होता. याप्रकरणी एलसीबीने तपास सुरु केला होता. त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, मयत सुपडु वेलसे हा संशयित आरोपी कुणाल उर्फ हितेश चुडामण मराठे (वय २१, रा. पेठ भाग भडगाव) याचे सोबत होता. त्यावरून वरील पथकाने कुणाल मराठे याचा पेठ भागात भडगाव येथे शोध घेवून त्यास ताब्यात घेत अटक करण्यात आली होती.
दरम्यान, सदर घटनेत आणखी संशयितांचा सहभाग असू शकतो म्हणून तपास सुरु होता. त्यानुसार तांत्रिक विश्लेषणाच्या आधाराने रोहित दिलीप मराठे (रा. वरची पेठ, भडगाव) याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. घटनेच्या दिवशी मुख्य संशयित आरोपी हितेश उर्फ कुणाल याच्या सोबत मयत सुपडू वेलसे याना दुचाकीवरून दगडाच्या खाणीत घेऊन गेल्याची कबुली त्याने दिली आहे. सदर संशयित रोहित मराठे याला अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला २४ मे रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदरचा तपास हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, पोनि पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे.