धरणगाव तालुक्यातील अनोरे येथील शेतकरी कुटुंबावर शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील अनोरे येथे एका शेतकरी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. परिवारातील महिलेने सकाळी गुळण्या करण्यासाठी चुकून बादलीतील फिनाइलचे पाणी पिल्याने तिची प्रकृती खालावली व त्यातच महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. २२ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
केवलबाई गुलाब पाटील (वय ६२, रा. अनोरे ता. धरणगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. ती अनोरे गावात पती, तीन मुले, सुना यांच्यासह राहत होती. केवलबाई यांचे पती गुलाब पाटील हे शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दि. २२ मे रोजी सकाळी घरामध्ये नेहमीप्रमाणे महिलांची घरकामे सुरू होती. त्यावेळेला फरशी पुसण्यासाठी बादलीमध्ये फिनाईल पाणी टाकण्यात आले होते. केवलबाईंना ते माहिती नसल्याने त्यांनी चुकून ते पाणी गुळण्या करण्यासाठी तोंडात टाकले.
त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तात्काळ कुटुंबीयांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून डॉक्टरांनी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून केवलबाई यांना मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला. दरम्यान अनोरे येथील पाटील कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून धरणगाव तालुक्यात हळूहळू व्यक्त करण्यात येत आहे.