जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शिरसोली येथे मंगळवारी दि. १४ मे रोजी एका लग्नादरम्यान बॅंड वादकाला काही जणांनी आवडीचे गाणं लावायला लावले, ते गाणं न लागल्याने तीन जणांनी एकाला जबर मारहाण करुन, जखमी केल्याची घटना रात्री ११ वाजता घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज रमेश नन्नवरे (वय २१, रा.शिरसोली प्र.बो) हा युवक एका बँड मध्ये कामाला आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे शिरसोली येथे मंगळवारी एक लग्न होते. त्या ठिकाणी रात्री नाच गाण्याचा कार्यक्रम होता. त्यावेळी काही जणांनी संबधित युवकाला आपल्या आवडीचे गाणं लावायला लावले. मात्र, हे गाणं न लागल्याने संतापलेल्या तिघांनी मनोज नन्नवरे या युवकाला जबर मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या मानेला व डोक्याला दुखापत झाली आहे. या प्रकरणी बुधवारी राहुल देवरे (वय २३, रा.कुसूंबा) याच्यासोबत दोन अनोळखींवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास समाधान टहाकळे हे करत आहेत.