चाळीसगाव तालुक्यातील दहिवद येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : गावठी कट्टा आणि चाकूचा धाक दाखवित ७ दरोडेखोरांनी १६ लाख ७६ हजार रुपयांचे दागिने आणि मोबाईल लांबवून नेल्याची थरारक घटना दि. १२ मे रोजीच्या मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घनश्याम धर्मराज पाटील (वय २९, ता. दहिवद ता. चाळीसगाव) हा तरूण कुटुंबासह राहायला असून रविवारी दि. १२ मे रोजी रात्री झोपलेले असतांना मध्यरात्री २.३० वाजता अज्ञात सात दरोडेखोर हे तोंडाला कापड लावून घराच्या मागच्या खिडकीचे गज कापून घरात आले. त्यांनी घनश्याम पाटील याला गावठी पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत त्यांच्या घरातील १६ लाख ५६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि २० हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल असा एकुण १६ लाख ७६ हजारांच्या मुद्देमालाची चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी हे करीत आहे.