जामनेर तालुक्यातील वाकडी येथील घटना
फत्तेपूर पोलिसांसह एलसीबी पथक तळ ठोकून
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील वाकडी येथे एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा खून भरदुपारी करण्यात आल्याची घटना दि. ११ मे रोजी दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान घडली आहे. याप्रकरणी पहूर, फत्तेपूर पोलीस स्टेशन आणि एलसीबीचे पथक संयुक्तपणे तपास करीत असून संशयित मारेकऱ्यांच्या मागावर आहेत. दरम्यान, हा खून वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिन्यांसाठी करण्यात आल्याचा प्राथमिक संशय असून ग्रामस्थांनी मात्र रविवारी दि. १२ मे रोजी सकाळी रास्ता रोको करून असंतोष व्यक्त केला.
राधाबाई भालचंद परदेशी (वय वर्ष ९०, रा. वाकडी ता. जामनेर) असे या वयोवृद्ध महिलेचे नाव आहे. गावात त्या एकट्याच राहत होत्या. काही अंतरावर त्यांचा मुलगा सुभाष (वय ६५) हे परिवारासह राहतात. तर दोन मुलींची लग्न झालेली आहेत. शनिवारी सकाळी मुलगा सुभाष यांच्या घरून त्या ११ ते सव्वा ११ वाजेच्या सुमारास निघून त्यांच्या घरी गेल्या होत्या. नंतर दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान त्यांचा अज्ञात मारेकऱ्याने खून केला. गावातील एक मुलगी राधाबाईंच्या घराजवळ आली असता तिला दरवाजा उघडा दिसला. तिने आत जाऊन पहिले असता हा प्रकार उघड झाला. मयत महिलेच्या चेहऱ्यावर जखमा होत्या व कानातील सोने ओरबाडून काढलेले दिसत होते. यानंतर पोलिसांनी सदर मृतदेह हा जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे नेला.
कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांनी आक्रोश केला. दरम्यान, रविवारी दि. १२ ला शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रविवारी ग्रामस्थांनी रास्ता रोको करून असंतोष व्यक्त केला. गावात अवैध धंदे बोकाळले असल्यामुळे ग्रामस्थांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे हे धंदे बंद करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.यावेळी अप्पर एसपी कविता नेरकर, डीवायएसपी धनंजय येरुळे यांनी घटनास्थळी भेट दिली. ग्रामस्थांना, अवैध धंदे बंद करण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. पुढील तपास फत्तेपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश फड करीत आहेत.