बीड (वृत्तसंस्था) – जिल्ह्यातील मांगवडगाव तिहेरी हत्याकांडातील पिडीत पवार कुटुंबियांची जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शनिवारी भेट घेतली आणि पवार कुटुंबियांचे सांत्वन केले. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून विशेष सरकारी वकिलाची नेमणूक केली जाईल असे मुंडे म्हणाले. तसेच या प्रकरणातील आरोपपत्र 50 दिवसांच्या आत दाखल करावे अशा सूचना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.

धनंजय मुंडे पालावर जाताच पवार कुटुंबियांनी ‘धनु भाऊ, आता तुम्हीच आमचे माय बाप आहात, आम्हाला न्याय द्या…’ अशी मागणी केली. यावेळी मुंडे यांनी या प्रकरणातील दोषींना शिक्षा मिळून 100 टक्के न्याय मिळेल अशी खात्री दिली. अंबेजोगाई येथे पालावर राहणाऱ्या पवार कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी मुंडे यांनी किमान तीन महिने पुरेल इतके अन्न धान्य पवार कुटुंबियांना देण्याबाबत स्थानिक तहसिलदारांना आदेश दिले आहेत. तसेच विभागामार्फत घरकुल योनेतून घरासाठी निधी व जागा उपलब्ध करून देण्यात येईल असेही मुंडे यांनी सांगितले. सामाजिक न्याय विभागामार्फत हत्या झालेल्या तीनही व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख 12 हजार रुपये आर्थिक मदत तात्काळ देण्यात आली आहे. तसेच योजनेनुसार उर्वरित 4 लाख 12 हजार रुपये रक्कम आरोपपत्र दाखल झाल्यानंतर देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
पवार कुटुंबीयांनी मुंडे यांच्यासमोर व्यथा मांडल्या. हे प्रकरण जमिनीच्या वादातून झाल्याचा संशय असल्याने आपल्याला आणखी धोका होऊ नये म्हणून इतरत्र जमीन मिळवून देण्याबाबत मुंडे यांना विनंती केली. पवार कुटुंबियांना इतरत्र जमीन मिळवून देऊ असे आश्वासन मुंडे यांनी दिले आहे. या भेटीवेळी मुंडे यांच्यासह आमदार संजय दौड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी आणि स्थानिक अधिकारी उपस्थित होते.







