मुंबई येथील स्पाईन फाउंडेशन यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे लाभले मार्गदर्शन
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभाग आणि मुंबई येथील स्पाईन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मणक्यांच्या शस्त्रक्रिया विशेष शिबिराचे शनिवार दि. १३ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये ५ रुग्णांच्या जटील शस्त्रक्रिया मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.
मणक्यांच्या आजाराविषयी नियमित रोग निदान व उपचार रुग्णालयात दर मंगळवारी ओपीडी क्रमांक ११५ समोर स्पाईन क्लिनिक येथे करण्यात येते. दरम्यान, नुकतेच मणक्यांच्या आजाराविषयी शिबिर घेण्यात आले होते. त्यात ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया लागू शकते त्यांची तपासणी देखील करण्यात आली. रुग्णांच्या रोगनिदानासाठी मुंबई येथील स्पाइन फाउंडेशनच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेण्यात आले. याबाबत अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी मणक्यांच्या शस्त्रक्रिया शिबिरासाठी लागणाऱ्या विविध बाबींचा आढावा घेतला. तसेच इम्प्लांटविषयी उपलब्धतेबाबत मार्गदर्शन केले.
अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजकुमार सूर्यवंशी, सहयोगी प्राध्यापक डॉ. राजेंद्र अग्रवाल, सहाय्यक प्राध्यापक डॉ. योगेंद्र नेहते यांनी आवश्यक असणाऱ्या १५ रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी निदान केले. त्यातील पाच रुग्णांची जटिल शस्त्रक्रिया शनिवार दि. १३ एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पार पडली. या शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन शनिवारी प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड उपस्थित होते. मुंबई येथील स्पाईन फाउंडेशनचे तज्ज्ञ डॉ. हर्षल बंब आणि डॉ. शितल मोहिते यांचा डॉ. किशोर इंगोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी अस्थिव्यंगोपचार विभागातील सहाय्यक प्रा. डॉ.पंकज घोगरे, डॉ. आदित्य जाधव, डॉ. सुमित पाटील, डॉ. अमोल पाटील, डॉ. शहेनशहा समशेर अली, डॉ. हनुमंत काळे, बधिरीकरण शास्त्र विभागातील प्रमुख डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. आशुतोष जयस्वाल, डॉ. अमित हिवरकर यांनी परिश्रम घेतले. त्यांना शस्त्रक्रिया गृहाच्या इन्चार्ज परिचारिका तुळसा माळी, अधिसेविका नम्रता नागापूरकर, रुपाली पाटील व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.