खा. उन्मेष पाटील यांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : मला दुसऱ्या पक्षांकडून ऑफर आल्या आहेत मात्र मी त्यासाठी कोणत्याही पक्षाच्या नेत्याला भेटलेलो नाही. मी भाजपमध्येच असून पक्षाचे काम इमानेइतबारे करीत आहे, अशी प्रतिक्रिया खा. उन्मेष पाटील यांनी दिली. खा. पाटील यांच्याविषयी गुरुवारी दिवसभर पक्षांतराविषयी चर्चा सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘केसरीराज’ ला माहिती दिली.
‘केसरीराज’ तर्फे खा. पाटील यांच्याशी संवाद साधून प्रतिक्रिया जाणून घेण्यात आली. खा. उन्मेष पाटील हे मातोश्रीवर जाणार असल्याचे वृत्त दिवसभर चर्चेत आले होते. त्यावर, खा. पाटील यांनी नकार दिला आहे. मला दुसऱ्या पक्षांकडून ऑफर आल्या आहेत मात्र मी त्यासाठी कोणत्याही पक्षाच्या नेत्याला भेटलेलो नाही. मी भाजपमध्येच असून पक्षाचे काम इमानेइतबारे करीत आहे, अशी प्रतिक्रिया खा. उन्मेष पाटील यांनी दिली. भारतीय जनता पक्षातर्फे जळगाव लोकसभा मतदारसंघात खा. उन्मेष पाटील यांच्याऐवजी माजी आ. स्मिता वाघ यांना तिकीट मिळाले आहे. त्यामुळे खा. पाटील हे नाराज असल्याबाबत मतदारसंघात चर्चा सुरु आहेत. नुकत्याच झालेल्या भाजपच्या जिल्हा बैठकीला खा. पाटील यांना आमंत्रण मिळालेले नव्हते. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी आमंत्रण मिळाले नसल्याबाबत दुजोरा दिला आहे. खा. उन्मेष पाटील ‘नॉट रिचेबल’ असल्याबाबतच्या वृत्तालाही त्यांनी नकार दिला.
विविध बॅनरवर देखील खा. पाटील यांचे फोटो दिसून येत नव्हते. सध्या भाजपच्या काही नेत्यांची मी सांगेल तसे वागा अशी वृत्ती दिसून येत असल्याबाबत काही पदाधिकाऱ्यांनीही माहिती दिली आहे. यामुळे खा. उन्मेष पाटलांसह कार्यकर्त्यांची नाराजी व घुसमट वाढत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, भाजपच्या जळगावच्या उमेदवाराला कोणी नेत्याने दत्तक घेतले असून निवडणूक खर्च तेच करणार असल्याबाबत व मी सांगेल तसेच वागा असे त्यांनी सांगितले असल्याची माहिती पक्षांतर्गत मिळत आहे.