चाळीसगाव तालुक्यातील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- सरकारी नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने तालुक्यातील एका युवकाला तीन लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी दोघांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शामकांत युवराज भोसले (२७, आमडदे, ता.भडगाव, ह.मु.चाळीसगाव) याने फिर्याद दिली आहे. २०२२ साली जुलै महिन्यात चाळीसगाव शहरातील स्टेशन रोडवरील एका पानटपरीवर संशयितांशी त्याची ओळख झाली. ओळख झाल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले व त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तरुणाने बँक खात्याद्वारे पाच लाख रुपये संशयितांना दिले. मात्र नोकरी न लागल्याने सतत तगादा लावल्यानंतर संशयितांनी दोन लाख रुपये परत केले.
मात्र उर्वरीत तीन लाख रुपये परत न केल्याने फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर तरुणाने चाळीसगाव शहर पोलिसात तक्रार नोंदवली. याप्रकरणी संशयित संजय कामतप्रसाद राजपूत (मुंबई नाका, नाशिक) व सुशील भालचंद्र पाटील (पंचवटी, नाशिक) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सागर ढिकले करीत आहे.