धरणगाव तालुक्यातील मुसळी फाटा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळील उड्डाणपुलाखाली कापूस व्यापाऱ्याच्या कारसमोर वाहन आडवे लावून एक कोटी ६० लाखांची रोकड दरोडेखोरांनी लुटून नेल्याची घटना शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. घटनेनंतर पोलिसांना माहिती मिळताच धरणगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक, पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. घटनास्थळावरून दरोडेखोरांच्या मागावर पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.
धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील दुर्गेश इम्पेक्स या कापूस जिनिंगचे पेमेंट जळगाव येथून संकलित करून पिंप्री येथे कारमधून नेले जात होते. ही कार निलॉन्स कंपनीसमोरील उड्डाणपुलाच्या खाली येताच स्कार्पिओमधून आलेल्या तिघांनी गाडी अडवून अवघ्या काही मिनिटांत पैसे लुटून पोबारा केला. निलॉन्स कंपनीसमोरील उड्डाणपुलाखाली त्यांची क्रेटा कार येताच बोलेरो कारने त्यांना समोरून जोरदार धडक दिली. त्यामुळे त्यांच्या क्रेटा कारच्या टायरवर धडक बसून टायर पंचर झाले.
स्कॉर्पिओ एक्सयुवीमधून उतरून दरोडेखोरांनी थेट क्रेटा कारवर हल्ला चढविला. कारमध्ये तिघे जण बसलेले होते. काही कळण्याच्या आधीच त्यांनी एक कोटी ६० लाखांची रोकड असलेली बॅग घेऊन जळगावच्या दिशेने पळ काढला. लुटण्यासाठी दरोडेखोरांनी वापरात आणलेली स्कार्पिओ कार घटनास्थळावरच सोडून पळ काढला आहे. कारमध्ये तलवार, लाठीकाठी, तसेच पिस्तूल असल्याचीदेखील माहिती मिळाली आहे. या लुटीच्या घटनेत एकापेक्षा अधिक वाहने आणि तीनपेक्षा अधिक दरोडेखोर आहेत. काम फत्ते होताच ते वाहन सोडून पाळतीवर असलेल्या नव्या वाहनातून वेगळ्याच दिशेने पळ काढला, जेणेकरून पोलिस आणि यंत्रणेला गुंगारा देण्यात येईल अशा नियोजनबद्ध पद्धतीने हा दरोडा टाकण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
नेमकी पैसे घेऊन जाणारी कार मुसळी फाट्यावर वळण घेत असताना उड्डाणपुलाच्या खालून शिरताच चोरट्यांनी समोरून सुसाट कार आणत धडक दिली. वाहने थांबताच लुटण्यासाठी आलेल्या तिघांनी या कारमधील तिघांच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकली. अर्थात चोरट्यांना पैशांची इत्थंभूत माहिती असून, एक कोटी ६० लाख घेऊन जाणारे उमेश, दीपक आणि आणखी एक अशा तिघांना पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी स्वतः आपल्या टिमसोबत वेगवेगळ्या पद्धतीने विचारपूस करत असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन्ही कार दोन दिवसांपूर्वी फैजपूर येथून चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरापर्यंत दरोड्याच्या गुन्ह्याबाबत फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू होते.