जळगाव ( प्रतिनिधी ) – मॉनिंग वाक करत असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने ४४ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील विदगाव येथे ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता घडली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतांना सोमवारी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मृत्यू झाला आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नरेंद्र पंढरीनाथ कोळी वय ४४ रा. विदगाव ता.जि.जळगाव असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, नरेंद्र कोळी हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह जळगाव तालुक्यातील विदगाव येथे राहायला होते. ते खासगी कंपनीत नोकरीला होते. शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता नेहमीप्रमाणे मॉर्निंग वाक करण्यासाठी घराबाहेर पडले. विदगावजवळील यावलरोडने पायी जात असतांना त्यांनी मागून भरधाव वेगाने येणारी दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईबी ०५११) ने जोरदार धडक दिली.
या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने गावातील ग्रामस्थांच्या मदतीने खासगी वाहनातून जळगावातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना सोमवारी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता त्यांचा मृत्यू झाला. यावेळी शासकीय वैदृयकीय महाविद्यालयात नातेवाईकांची गर्दी होती. दरम्यान याप्रकरण जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई अनुसयाबाई, पत्नी शारदा मुलगा महेश आणि निलेश ही दोन मुले असा परिवार आहे.