जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये शांती सभेतून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महात्मा गांधी यांनी आपल्या कृतिशील आचरणातून व विचारांतून राष्ट्रालाच स्वतंत्र केले नाही तर संस्कारशील नागरिकत्वातून राष्ट्र निर्माणाची आत्मप्रेरणा दिली. यातून सर्वोदय ही संकल्पना समोर आली. महात्मा गांधीजींनी दिलेला अहिंसेचा संदेश प्रत्येकाच्या मनात आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हुतात्मा दिन ही पाळला जातो. स्वदेशी व स्वावलंबनाच्या मार्गाची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या जीवन चरित्राचा तरुणांना, येणाऱ्या पिढीला अभ्यास करता यावा, यासाठी श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी गांधीतीर्थची निर्मिती केली.
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनसह जैन इरिगेशनमधील सर्व आस्थापनांमधील १०,००० हून अधिक सहकाऱ्यांनी त्यांना अभिवादन केले. यावेळी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन सुद्धा सहभागी झाले होते. कंपनीच्या मुख्यालयासह भारतातील सर्व कार्यालयांमध्ये सायंकाळी ५.१७ वाजता सर्व सहकाऱ्यांनी स्तब्ध उभे राहून राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना श्रद्धांजली अर्पण केली.