जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा फाटाजवळील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील मन्यारखेडा फाटाजवळ झालेल्या भीषण अपघातात जळगावमधील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी मयत तरुणाच्या कुटुंबीयांनी शासकीय रुग्णालयात मोठा आक्रोश केला असून नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
नेहाल राजेश माछरे (वय १८, रा. कंजरवाडा, जळगाव)असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, तीन भाऊ, एक बहिणीसह कंजरवाडा परिसरात वास्तव्याला आहे. एका फोटो स्टुडिओत् तो कामाला होता. तसेच शिक्षणही करत होता. त्याचे वडील राजेश माछरे हे हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.दरम्यान त्याचा भाऊ अक्षय राजेश माछरे (वय २३) आणि त्याचे नंदुरबार येथून आलेली आतेबहीण उन्नती रविचंद्र रमाईचेकर (वय १२) हे दोघेजण सोमवारी २२ जानेवारी रोजी सुट्टी असल्यामुळे बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारुती मंदिर येथे दर्शनासाठी गेले होते.
सकाळी दर्शन आटोपून परतत असताना १० वाजेच्या सुमारास मन्यारखेडा फाटाजवळ पुढील तरुणांच्या दुचाकीचा घसरून भीषण अपघात झाला. यावेळी स्थानिक नागरिकांनी व पोलिसांनी धाव घेत त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी नेहाल माछरे यास वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य साळुंखे यांनी मयत घोषित केले.
तर जखमी अक्षय माछरे व उन्नती तमायचेकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान मयत नेहालच्या कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली. त्यावेळेला त्यांनी मन हेलावणारा आक्रोश केला. यावेळी समाजबांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान नशिराबाद् पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.