धरणगाव शहराजवळ घटना, साळवा गावावर शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) :- धरणगाव शहराजवळ भरधाव आयशरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार इसम जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोरेश्वर लोटू अत्तरदे (वय-५०, रा.साळवा ता. धरणगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. धरणगाव तालुक्यातील साळवा येथे मोरेश्वर अत्तरदे आपल्या वडिलांसह वास्तव्याला आहे. सामाजिक कार्यकर्ते व शेतीचे काम करून ते उदरनिर्वाह करतात. गेल्या चार ते पाच दिवसांपासून ते नातेवाईकांकडे मुंबई येथे गेले होते. गुरुवार ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ते मुंबई येथून धरणगाव येथे आले होते. दरम्यान धरणगाव येथून त्यांनी त्यांच्या दुचाकीने गावी साळवा येथे जाण्यासाठी सकाळी ६.३० वाजता निघाले.
धरणगावच्या पुढे असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ चोपडाकडून धरणगावकडे येणाऱ्या अज्ञात आयशर वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत मोरेश्वर अत्तरदे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर साळवा गावातील नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.