“उद्योजक आपल्या भेटीला” उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : – मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयात महाराष्ट्र करिअर कट्टा मार्फत “उद्योजक आपल्या भेटीला” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्रीराम उद्योग समूहाचे मालक श्रीराम दयाराम पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले .
उद्योजकतेविषयी मार्गदर्शन करत असताना त्यांनी आपला उद्योजक बनण्याचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर थोडक्यात उलगडला . तुम्हाला शाळेत किंवा महाविद्यालयात मिळालेले मार्क्स हे तुमच्या उद्योजकतेच्या प्रवासात कधीच अडसर ठरू शकत नाहीत तसेच तुम्ही कोणत्या भाषेतून शिक्षण घेतले हेही तितकेसे महत्त्वाचे नसते याविषयी कोणताही न्यूनगंड न बाळगता जो फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतो तो नक्कीच यशस्वी होऊ शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले . उत्तम निरीक्षण क्षमता, निर्णय क्षमता आणि योग्य अंमलबजावणी या त्रिसूत्रीचे पालन करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला .
कार्यक्रमाचे अध्यक्षपद मुजे महाविद्यालयातील भाषा प्रशाळेचे प्रमुख प्रा. भूपेंद्र केसुर यांनी भूषवीले. अध्यक्षीय भाषण करताना त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठी आवश्यक अशा कौशल्यांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुजे करिअर कट्टा चे समन्वयक प्राध्यापक राजीव पवार यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजदामिनी अहिरे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन रुद्रक्षी शहा यांनी केले. कार्यक्रमाच्या परिपूर्णतेसाठी करिअर कट्टा संसदेचे सहकार्य लाभले .