रामानंद नगर पोलिसांची धडक कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या शिव कॉलनी येथे बंद कराचे कुलूप तोडून घरात ठेवलेले अम्प्लिफायर व साऊंड सिस्टम असा एकूण १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी चार चोरट्यांना रामानंदनगर पोलिसांनी गुरुवार १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
प्रदीप सुदाम वाणी रा. मेहरून जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे शिव कॉलनी परिसरात घरात त्यांनी त्यांच्या मालकीचे ऍम्प्लिफायर व साऊंड सिस्टम असा एकूण मुद्देमाल ठेवण्यात आला होता. दरम्यान २९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी साऊंड सिस्टिम व अंपलिफायर असा एकूण १ लाख ११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी गुन्ह्यातील आरोपींच्या शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पथकाने संशयित आरोपी सागर राजाराम गवळी (वय-२९, रा. पिंपळा हुडको), अब्रार अमित खाटीक ( वय-१८, रा. उस्मानिया पार्क), समीर शेख इकबाल (वय-२२) आणि अमोल प्रकाश शिरसाठ (वय-२५) रा. दूध फेडरेशन हुडको या चौघांना अटक करून त्यांच्याकडून चोरी गेलेल्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित आणि पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय सपकाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुशील चौधरी, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, हेमंत कळस्कर, विनोद सूर्यवंशी, अतुल चौधरी, उमेश पवार आणि रवींद्र चौधरी यांनी कारवाई केली आहे.